भारताचे राष्ट्रपती मा. रामनाथ कोविंद यांची त्यांच्या पुणे भेटीदरम्यान सोमवार, दि. ६ डिसेंबर २०२१ रोजी संध्याकाळी राजभवन येथे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेतली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव रा. सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष सीए अभय प्र. क्षीरसागर, सचिव प्रा. डॉ. भरत सि. व्हनकटे उपस्थित होते. या प्रसंगी मा. राष्ट्रपतींना म.ए.सो. चे माहितीपत्रक, माहितीपटाची सीडी आणि स्मृतिचिन्ह भेट देण्यात आले.
या भेटीत झालेल्या चर्चेदरम्यान संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मा. राष्ट्रपतींना म. ए. सो. च्या कार्याबद्दल आणि विस्ताराबद्दल माहिती दिली. संस्थेचे संस्थापक आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांनी स्वातंत्र्य लढ्याबरोबरच देशातील नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना आणि आत्मभान जागृत करण्यासाठी असलेली राष्ट्रीय शिक्षणाची गरज लक्षात घेऊन संस्थेची स्थापना केल्याचे सांगितले. म.ए.सो. च्या कार्याचा विस्तार आता बालवाडी ते पदव्युत्तर शिक्षण आणि त्यापुढे जाऊन संशोधन केंद्रापर्यंत झाल्याची माहिती त्यांना देण्यात आली. ‘मएसो’तर्फे मुला-मुलींसाठी सुरू असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांबद्दल मा. राष्ट्रपतींनी यावेळी समाधान व्यक्त केले.
‘मएसो’ने महिला सक्षणीकरणाच्या हेतूने मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा सुरू केली असून मुलींसाठी असलेली राज्यातील ही पहिली निवासी सैनिकी शाळा असल्याचे सांगितले. या शाळेच्या गेल्या २५ वर्षांतील वाटचालीबद्दल मा. राष्ट्रपतींना माहिती देण्यात आली. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सैनिकी शाळेतील मुलींना आता राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये थेट प्रवेशाची संधी उपलब्ध झाली आहे, सैनिकी प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थिनींच्या भवितव्याच्या दृष्टीने हा खूप महत्वाचा निर्णय घेण्यात आल्याबद्दल मा. भूषणजी गोखले यांनी आभार व्यक्त केले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात संस्थेने केलेल्या योगदानाची माहिती मा. राष्ट्रपतींना या वेळी देण्यात आली.
सन २०१८ साली पुणे भेटीदरम्यान एका कार्यक्रमात केलेल्या भाषणात मा. राष्ट्रपतींनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीबद्दल प्रशंसोद्गार काढल्याचे स्मरण संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव रा. सहस्रबुद्धे यांनी करून दिले, तेव्हा मा. राष्ट्रपतींनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १६० वर्षांच्या वाटचालीचा इतिहास उलगडून सांगणाऱ्या ‘ध्यासपंथे चालता…’ या ग्रंथांबद्दल जाणून घेतल्यानंतर मा. राष्ट्रपतींनी, हा ग्रंथ प्रकाशित झाल्यानंतर त्याची प्रत भेट देण्यासाठी राष्ट्रपती भवनात येण्याची सूचना यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना केली.